Home राजकीय घडामोडी पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराचा कोहळेंकडून अहेरीत श्रीगणेशा

पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराचा कोहळेंकडून अहेरीत श्रीगणेशा

धर्मरावबाबा आत्राम यांची घेतली भेट

अहेरी : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा अहेरीतून केला. यावेळी त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला. या भेटीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

भाजपा-महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेऊन महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीच्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली. यावेळी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक तयारी, प्रचाराचे नियोजन तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाली.

याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, ज्येष्ठ नेते रविंद्र ओल्लालवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.