Home दैनंदिन बातम्या तब्बल 31 तासानंतर भामरागडसह 50 वर गावांची वाहतूक पूर्ववत सुरू

तब्बल 31 तासानंतर भामरागडसह 50 वर गावांची वाहतूक पूर्ववत सुरू

पावसाच्या विश्रांतीनंतर उतरला पूर

भामरागड : पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून बंद झालेली वाहतूक मंगळवारी पूर ओसरल्यानंतर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पुन्हा सुरळीत सुरू झाली. मात्र पर्लकोटी नदी अजूनही दुथडी भरून वाहात असून पुलापासून जेमतेम एक ते दिड फूट अंतरावर आहे. (खाली वाचा)

पुरामुळे भामरागडसह लगतच्या अनेक गावांमधील नागरिक पूर ओसरण्याची वाट पहात दोन्ही बाजुंनी अडकून पडले होते. पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊन पुलाखाली गेल्यानंतर प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. पर्लकोटा नदीसह इतर नाल्यांच्या पुरामुळे 50 पेक्षा जास्त गावांचा भामरागडशी आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला होता. (खाली वाचा)

नागरिकांनी सोमवारची रात्र काढली जागून
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला होता. सोमवारी सकाळी पुलावर पाणी चढल्यानंतर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी 11 वाजल्यापासून पोलीस तैनात करुन पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. (खाली वाचा)

पुलावरून वाहात असलेले पाणी हळूहळू गावाच्या दिशेने चढत होते. दिवसाची वेळ असल्याने चौकापर्यंतच्या दुकानदारांनी आणि रहिवाशांनी सावध होऊन आधीच आपले सामान हलविण्यास सुरूवात केली होती. रात्रभरात पुराचे पाणी किती चढते आणि पुन्हा आपली घरे पाण्यात जातात का, या भितीने अनेकांनी सोमवारची रात्र जागून काढली. (खाली वाचा)

काल (मंगळवारी) पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाणी उतरण्यास सुरूवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुलाच्या खालून वाहू लागताच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. पुलावर वाहनधारकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. पुलावरून जाणाऱ्या वाहनांना पोलिसांच्या नियंत्रणातच सोडले जात होते. (खाली वाचा)

नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास पुन्हा वाहतूक बंद होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच पुलावर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (खाली वाचा)

तहसीलदार किशोर बागडे, तसेच भामरागड पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन शेवाळे स्वत: उपस्थित राहून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. भामरागड पोलीस स्टेशनच्या दिमतीला पोलिसांचे क्यूआरटी पथकही तैनात केले होते. (खाली वाचा)

दरम्यान पर्लकोटा नदीवर उभारल्या जात असलेला पूल पुढील पावसाळ्यापर्यंत पूर्ण होण्याची आशा असली तरी पुराचे पाणी गावात शिरणार नाही यासाठी काय उपाययोजना करणार याबाबतचे नियोजन अद्याप झालेले नाही. प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, किंवा पूरपीडितांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी जोर धरत आहे.