Home दैनंदिन बातम्या त्रिसदस्यीय समिती करणार पूल दुर्घटनेमागील कारणांची चौकशी

त्रिसदस्यीय समिती करणार पूल दुर्घटनेमागील कारणांची चौकशी

कोठी–कोरनारसाठी 'एसआयटी'

गडचिरोली : मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला कोठी–कोरनार दरम्यानचा पूल अवघ्या 3 वर्षात कोसळल्याप्रकरणी अखेर 22 दिवसांनी विशेष चौकशी समिती (एसआयटी) गठीत करण्यात आली आहे. या तीन सदस्यीय समितीमध्ये आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक सोविक बॅनर्जी हे अध्यक्ष, तर संकल्पचित्र विभागाचे मुख्य अभियंता (मुंबई) आणि दक्षता व गुणनियंत्रण मंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंता हे दोन सदस्य असतील.

पुलाच्या बांधकामातील गुणवत्ता, वाढीव खर्च, प्रशासकीय व तांत्रिक निर्णय, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी तपासण्यासाठी शासनाने ही एसआयटी स्थापन केली असून 30 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोठी–कोरणार पूल कोसळल्यानंतर अनेकांनी या विषयावर आवाज उठवला. पण आझाद समाज पक्षाने सर्वप्रथम हा मुद्दा उचलून धरला होता. शासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने दि.19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव आंदोलन करून मागणी तीव्र झाल्यानंतर संघर्षाची दखल घेत शासनाने दि.21 रोजी चौकशीचे आदेश दिले.

सुरुवातीच्या ₹4.09 कोटींच्या आराखड्यातून खर्च ₹8 कोटींपर्यंत वाढविण्याच्या प्रशासकीय-आर्थिक-तांत्रिक निर्णयांची वैधता, देखरेखीतील त्रुटी आणि संबंधित कंत्राटदार व विभागीय अभियंत्यांची जबाबदारी तपासण्याचे निर्देश आहेत.