Home क्राईम वानरचुवाच्या जंगलातील दोन हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई

वानरचुवाच्या जंगलातील दोन हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई

3 लाख 44 हजार रुपयांचा सडवा नष्ट

धानोरा : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांवर धानोरा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मौजा वानरचुवा जंगल परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी अवैध मोहफुलाच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मोहफुल सडव्याने भरलेले ड्रम फोडून तो सडवा नष्ट करण्यात आला.

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी वानरचुवा येथील प्रमोद अंताराम हलामी (42 वर्ष) याच्या मोहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. आरोपीच्या घरामागील जंगल परिसरात ही दारूभट्टी लावली होती. मात्र पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने आरोपी जंगल परिसराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पसार झाला. यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणाची पाहणी केली असता, घटनास्थळी 200 लिटर क्षमतेच्या 15 प्लास्टिक ड्रममध्ये एकूण 3000 किलो मोहफुल सडवा (किंमत अंदाजे 3 लाख रुपये), 20 लिटर मोहफुलाची दारु (किंमत अंदाजे 4,000 रुपये) आढळून आली. हातभट्टीचे साहित्य, तयार हातभट्टी दारु व प्लास्टिक ड्रममधील मोहफुलाचा सडवा नियमानुसार घटनास्थळावरच नष्ट करण्यात आला.

यासोबतच शिवराम अन्नाजी बोगा (45 वर्ष), रा.वानरचुवा त्याच्या राहत्या घरी विक्रीसाठी ठेवलेली मोहफुलाची दारु आढळली. घराच्या बाजुला असलेल्या झोपडीमध्ये 200 लिटर क्षमतेच्या एका प्लास्टिक ड्रममध्ये 200 लिटर मोहफुल दारु (अंदाजे किंमत 40 हजार रुपये) आढळून आली. तीसुद्धा घटनास्थळावरच नष्ट करण्यात आली.

या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोराचे प्रभारी अधिकारी पोनि.कैलास गवते, पोउपनि. अजय कोरडे, पोहवा जन्हेरसिंग उसेंडी, अंमलदार सुशील मेश्राम, प्रशांत ताडोसे, राहुल बनकर, विक्रांत मोहुर्ले व प्रियंका कावळे यांनी पार पाडली.