Home दैनंदिन बातम्या आलापल्ली वनक्षेत्रातील कामांच्या अनियमिततेप्रकरणी कारवाई करा

आलापल्ली वनक्षेत्रातील कामांच्या अनियमिततेप्रकरणी कारवाई करा

मानवाधिकार संघटनेची मागणी

गडचिरोली : आलापल्ली वनपरिक्षेत्रात जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा आदिवासी उपयोजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांबाबतच्या चौकशीत एकूण 48 कामांमध्ये अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे व गंभीर त्रुटी निष्पन्न झाल्याचा चौकशी अहवाल उपलब्ध असतानाही, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्यावर अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शंकर ढोलगे व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केला आहे.

सदर प्रकरणात चौकशी अहवाल उपलब्ध असूनही संबंधित अधिकाऱ्यावर निलंबन अथवा विभागीय चौकशीची ठोस कारवाई न झाल्याने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत या पदाधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली. गणवीर यांच्या कार्यकाळातील कथित बोगस मजूर नोंदी, मजुरी देयके, मस्टर व्हाउचर, बँक व्यवहार तसेच विविध विकास कामांतील आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

जबाबदारी सिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींकडून शासकीय नुकसानाची नियमानुसार वेतन अथवा इतर देय रकमेतून वसुली करण्यात यावी. चौकशीच्या कक्षेत न आलेल्या उर्वरित सर्व कामांचे वन विभागाबाहेरील स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून मोजमाप पुस्तिका (MB), अंदाजपत्रक, मंजूर मात्रा, बिल-वाउचर, मजूर नोंदी व प्रत्यक्ष झालेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी. उर्वरित कामांच्या पुनर्मूल्यांकनात आर्थिक नुकसान, जादा देयक, अपूर्ण अथवा निकृष्ट काम आढळल्यास त्याची रक्कम निश्चित करून संबंधितांकडून नियमानुसार वसुली व विभागीय / कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कथित बोगस मजूर प्रकरणातील मजुरांची नावे, त्यांच्या नावाने काढण्यात आलेली मजुरी व संबंधित बँक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

या मागण्यांवर तात्काळ ठोस कारवाई करण्यात आली नाही तर गडचिरोलीत गांधी चौक ते मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), वनवृत्त गडचिरोली कार्यालयापर्यंत ढोल-ताशांसह एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असे भ्रष्टाचार निर्मूलन समिती व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने शंकर ढोलगे, रमेश अधिकारी, नानु उपाध्ये, कृष्णा वाघाडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, भूषणा खेडेकर, राणी गोपशेट्टीवार, मोरेश्वर भांडेकर, भीमराव वनकर आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.