
चामोर्शी : प्रस्तावित विविध प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण रद्द व्हावे यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी संबंधित गावांमधील शेतकऱ्यांनी श्रावणातील शेवटच्या सोमवारी मार्कंडादेव येथे भजन-दिंडीसह दाखल होऊन महाअभिषेक केला. शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने आणि महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या पुढाकाराने या महाअभिषेकाचे आयोजन केले होते.
शेतकरी, महिला व युवकांची उपस्थिती
जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या धार्मिक उपक्रमातून करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा, शेतीमालाला योग्य भाव, खतांचा प्रश्न, सिंचन, रस्ते, रोजगार, आरोग्य, महिलांच्या सुरक्षिततेसह जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निराकरण करावे, यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती गडचिरोलीच्या वतीने श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे भव्य महाअभिषेक सोहळा आयोजित केला होता.
यावेळी श्री मार्कंडेश्वर महादेवाला महाअभिषेक करण्यात आला. या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला आणि नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागाव्यात, शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी, यासाठी श्री मार्कंडेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पास्ते, अमरावतीचे वानखेडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस नेते अॅड.दुष्यंत नामदेव किरसान, नगरसेवक सतीश विधाते, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरीचे मिलिंद खोब्रागडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सलोटकर, पर्यावरण विभाग सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, विजय लाड, कविता भगत, तात्याजी चिचघरे, विजयानंद महाराज रोडे, नदीम नाथानी, हरबाजी मोरे, गौरव येनप्रेड्डीवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, राजू बोदलकर, विलास चिचघरे, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत आदींसह पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, युवक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गावातून काढली दिंडी
मार्कंडात पोहोचण्यापूर्वी सकाळी हिरापूर येथून टाळ-मृदंगाच्या निनादात दिंडी काढण्यात आली. जमिनी वाचविण्यासंदर्भात विविध फलकं हाती घेऊन मोठ्या संख्येने गावकरी, महिला, मुले यात सहभागी झाले होते. नंतर ही दिंडी मार्कंडा येथे पोहोचल्यानंतर नागरिकांनी महाअभिषेकात सहभाग घेतला.
































