गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी शहरातील अवैध दारू तस्करांविरोधात रविवारी केलेल्या दोन कारवायांमध्ये एका दुचाकीसह 2 लाख 70 हजारांची देशी-विदेशी दारू जप्त केली. यातील एका कारवाईत रुपाश्री व्यंकटेश बैरवार या महिला आरोपीला अटक केली, तर कुख्यात दारू तस्कर व्यंकटेश बैरवार आणि गोपाल बावणे हे पोलिसांच्या हाती लागू शकले नाही. त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी शहरातील सर्वोदय वार्डातील कुख्यात दारू तस्कर व्यंकटेश बैरवार याच्या घरी रविवारी सकाळी धाड टाकली. यावेळी 2 पेटी इंग्रजी आणि 17 पेटी देशी दारू आढळून आली. पोलिसांनी या ठिकाणाहून 1 लाख 45 हजार रुपयांची दारू जप्त करून व्यंकटेशची पत्नी रुपाश्रीला ताब्यात घेतले, मात्र पोलिसांची कुणकुण लागताच व्यंकटेश फरार झाला.
दुसऱ्या कारवाईत रविवारी पहाटेच्या पोलिसांचा डीबी स्कॅाड गस्तीवर असताना गोपाल बावणे हा ढिवर मोहल्यात (सुभाष वार्ड) दुचाकीने चिल्लर विक्रेत्यांना दारू पुरवठा करताना आढळून आला. पोलिसांना पाहताच तो दुचाकी सोडून पळाला. पोलिसांनी घटनास्थळावरून 10 पेटी देशी दारूसह एक दुचाकी असा 1 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.