गडचिरोली : धान भरडाई घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेले आणि न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले अजय राईस मिलचे मालक भास्कर डांगे जवळपास दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागल्यापासून ते फरार झाले. मोबाईलच्या माध्यमातून पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील याची माहिती असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांचा मोबाईलसुद्धा बंद आहे. त्यामुळे त्यांना शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)

आरमोरी येथील जनता राईस मिलने निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात पाठवून 7 लाख 85 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे मिल मालकावर 2 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर देसाईगंज पोलीस ठाण्यात अजय राईस मिलचा मालक भास्कर डांगे, सोनल पोहा उद्योग मिलच्या मालक माया प्रभाकर डांगे आणि कुरूडच्या शारदा स्टिम प्रॅाडक्टचे मालक राजकुमार अर्जुनदास मोटवाणी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.
भास्कर डांगे यांच्या अजय राईस मिलमधील तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल पुरवठा विभागाने दिला होता. त्यामुळे डांगे यांनी आपल्या वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण तो अर्ज 23 मे रोजी जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. सोनल पोहा उद्योगच्या माया डांगे यांनी दंडाची रक्कम भरल्याने त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.
अजय राईस मिलमधील धान भरडाई घोटाळ्याचा तपास कुरखेडाचे एसडीपीओ दिनकर भोसले करीत आहेत. आरोपी भास्कर डांगे फरार असला तरी त्याला लवकरच पोलीस हुडकून काढतील, असा विश्वास एसडीपीओ भोसले यांनी व्यक्त केला.