गडचिरोली : हिरमुसलेल्या खरीपातील पिकांना दिलासा देण्यासाठी पावसाचे जिल्ह्यात सर्वदूर पुनरागमन झाले आहे. त्यातच राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना– 2026’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील 3 हजार 610 शेतकरी पात्र झाले आहेत. या दोन्ही घडामोडी बळीराजासाठी आनंददायी ठरल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4371 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे 25 कोटी रुपये जमा झाले आहेत. (खाली वाचा)

दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांनी विलंब न करता ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
राज्य शासनाने दि.2 जून व 15 जुलै 2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना– 2026’ जाहीर केली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 671 शेतकरी पात्र ठरले होते, तर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 3 हजार 610 शेतकरी पात्र ठरले आहेत.
दरम्यान, योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकूण 4 हजार 371 शेतकऱ्यांच्या खात्यात 25 कोटी 2 लाख 50 हजार 395 रुपये जमा करण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम यांनी कळवले आहे.
दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित करण्यात आलेले, 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेले अल्पमुदत पीककर्ज विचारात घेतले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील एकत्रित थकीत मुद्दल व व्याजाच्या रकमेवर प्रतिशेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन
सन 2023-24 अथवा 2024-25 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे अथवा पूर्णतः परतफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या पात्र कर्जाच्या रकमेनुसार प्रतिशेतकरी कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
दुसऱ्या टप्प्याची यादी प्राप्त; गावपातळीवर प्रसिद्धी
दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाकडून दि.11 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील 3 हजार 610 शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व संबंधित बँक शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
दुसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्जमुक्तीबाबत संदेशही पाठविण्यात आला आहे. तथापि, मोबाईलवर संदेश प्राप्त झाला नसला तरी शेतकऱ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र यादीत आपले नाव तपासावे आणि नाव असल्यास आवश्यक प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य
कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. प्रमाणीकरण करताना अथवा कर्ज खात्याच्या माहितीत काही अडचण आल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी किंवा सहकार विभागाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांनी पात्र यादीत आपले नाव तपासून ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे. काही अडचण असल्यास संबंधित बँक शाखा किंवा सहकार विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मुकुंद मेश्राम यांनी केले आहे.
































