Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीच्या मुख्य तलावात साकारावे स्वामी विवेकानंदांचे स्मारक

गडचिरोलीच्या मुख्य तलावात साकारावे स्वामी विवेकानंदांचे स्मारक

प्रस्ताव सादर करण्याची दिली सूचना

तलावाच्या काठावर सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य तलाव परिसराचे सुरू असलेले सौंदर्यीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. या परिसरात स्वामी विवेकानंद यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी कारगिल स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष उदय धकाते यांनी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत डॅा.नरोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना केली आहे.

हिंदी महासागरातील स्वामी विवेकानंद स्मारकापासून प्रेरणा घेत गडचिरोलीच्या मुख्य तलावातही विवेकानंदांचे स्मारक उभारण्याची संकल्पना उदय धकाते यांनी मांडली आहे. हे स्मारक युवक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरण्यासोबतच गडचिरोलीच्या पर्यटन व सौंदर्यात भर घालणारे नवे आकर्षण ठरू शकते. स्मारकासोबत स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार, माहिती फलक, आकर्षक प्रकाशयोजना आणि परिसराचे सुशोभीकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आमदार डॉ.नरोटे यांनी धकाते यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक प्रस्ताव शासनास सादर करून कार्यवाही करण्याची सूचना दिल्याने, या प्रस्तावाला आता प्रशासकीय स्तरावर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गडचिरोलीचे आकर्षण ठरलेले कारगिल स्मारक उभारण्यासाठी उदय धकाते यांनीच पुढाकार घेतला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हे स्मारक साकारले आहे. आता त्याच धर्तीवर शहराच्या मध्यवर्ती तलाव परिसरात स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी पुढे आणला आहे.