Home दैनंदिन बातम्या गोडलवाहीतील आरोग्य शिबिरात वैद्यकीय तपासणीसह जनजागृती

गोडलवाहीतील आरोग्य शिबिरात वैद्यकीय तपासणीसह जनजागृती

गडचिरोली पोलीस दलाचे आयोजन

गडचिरोली : पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने आरोग्य मेळावे आयोजित केले जात आहेत. दि.13 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा गोडलवाही येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये डॉ.गणेश चिचघरे, डॉ.रोशनी किरंगे, रेवतीकांत गराडे (औषधी निर्माण अधिकारी), सोनाली कुमरे (अधिपरिचारीका) यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर शिबिरादरम्यान हद्दीतील सुमारे 101 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करुन आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सदर आरोग्य शिबिराचे आयोजन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सहा.पोलीस अधीक्षक, पेंढरी कॅम्प कारवाफा सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें गोडलवाहीचे पोउपनि.अजिंक्य इथापे, पोउपनि. ज्ञानेश्वर सोलंकी व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

आतापर्यंत 219 आरोग्य मेळावे

आजपावेतो गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून एकूण 219 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण 50 हजारपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच एकूण 6 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण 4,864 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात कार्यरत असताना शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-60 जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.