गडचिरोली : जिल्ह्यातील समाजकल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘मिशन शिखर’ अंतर्गत देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यासोबतच दररोज 1 तास वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी क्लास घेण्यात येणार आहे.
यासाठी समाज कल्याण विभाग गडचिरोली आणि एकलव्य फाऊंडेशन नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एकलव्य फाऊंडेशनच्या मदतीने वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 2027 मध्ये होणार्या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होऊन देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
लंडन स्कूल ऑफ इकॅानॅामिक्स, दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, टीआयएसएस, अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी इत्यादी विद्यापीठात विद्यार्थी शिकतील याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. 2027 मध्ये कमीत कमी 500 विद्यार्थी नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सहायक आयुक्त डॅा.सचिन मडावी यांनी सांगितले.
































