Home दैनंदिन बातम्या अहेरीतील दानशुरांचा राजा गणेश मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी

अहेरीतील दानशुरांचा राजा गणेश मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी

मा.खा. अशोक नेते यांची उपस्थिती

अहेरी : येथील दानशुरांचा राजा गणेश मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत अहेरी येथे रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी तसेच सिकलसेल व विविध आजारांची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.

या आरोग्य शिबिराला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेत शिबिराची पाहणी केली. यावेळी डॉ.नेते यांनी स्वतःचीही आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच नेत्र तपासणी केलेल्यांना चष्म्यांचे वाटप केले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विनामूल्य आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, सिकलसेल तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी (OSD) अनिरुद्ध पालकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॅा.कन्ना मडावी, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी डॅा.मनोहर मडावी, जिल्हा सचिव सागर डेकाटे, वैशाली नैताम, दानशुरांचा राजा गणेश मंडळ अहेरीचे रवी नेलकुद्री, अध्यक्ष अजय पुल्लुरवार, तसेच विनोद जेल्लेवार, रमेश समुद्रवार, नितीन दंतुलवार, रोशन नामनवार, प्रशांत नामनवार, आदित्य इप्पावार यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.