Home क्राईम बेशिस्त वागणुकीसाठी आरमोरी ठाण्यातील 2 कॅान्स्टेबल निलंबित

बेशिस्त वागणुकीसाठी आरमोरी ठाण्यातील 2 कॅान्स्टेबल निलंबित

विभागीय चौकशीचे एसपींचे आदेश

गडचिरोली : पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी माओवाद्यांवर ‘अंतिम प्रहार’ करत त्यांचे अस्तित्व संपवल्यानंतर जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून काहीसे बिनधास्तपणे दारू, जुगार, सुगंधित तंबाखूच्या व्यवसायात गुंतलेल्यांना आता टिकाव धरणे कठीण होऊ लागले आहे. यासोबत त्यांच्याशी जुळवून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. यातूनच आरमोरी ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर बेशिस्त वागणुकीचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दारूबंदी नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची सीमा थोड्याच अंतरावर असल्याने आरमोरी तालुक्यात सहजपणे, पण अनधिकृतरित्या दारूची आयात होत असते. मात्र आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारूची अवैधपणे विक्री करणाऱ्यांचे ठावठिकाणे पोलिसांना माहित असले तरी त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी ठाण्यातील काही अधिकारी-कर्मचारी त्यांच्याशी मधूर संबंध जपत असल्याचे आढळले होते. दोन महिन्यांपूर्वी आरमोरी शहराच्या मुख्य मार्गावरील दारूसाठ्याच्या गोदामावर सहायक पोलीस अधीक्षक तथा गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांनी छापा टाकून राजरोसपणे उपलब्ध होणाऱ्या दारूविक्रीचा कारनामा उघडकीस आणला होता. त्यानंतर ते अनधिकृत गोदाम पाडण्यातही आले. एवढेच नाही तर पोलीस निरीक्षकांची बदलीही झाली.

असे असले तरी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सवयी बदलल्या नाही. त्यामुळे बेशिस्त वागणुकीची सजा म्हणून आरमोरी ठाण्यातील दिनेश भोसले आणि दिलीप लंबुवार या दोन पोलीस कॅान्स्टेबलच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी काढले. एका पोलीस उपनिरीक्षकावरही कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दोन कॅान्स्टेबलच्या निलंबनासोबत त्यांची विभागीय चौकशीही केली जात असल्याचे सांगितले. या कारवाईमुळे बेशिस्तपणे वागणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जरब बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.