Home दैनंदिन बातम्या समन्वय आणि सकारात्मक संवादातून ‘माओवादमुक्त भारत’ होणे शक्य

समन्वय आणि सकारात्मक संवादातून ‘माओवादमुक्त भारत’ होणे शक्य

पत्रकारांच्या कार्यशाळेत वक्त्यांचा सूर

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे, मंचावर पोलीस अधिकारीगण व पत्र सूचना कार्यालयाचे अधिकारी

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल आणि केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पत्रकारांसाठी ‘माओवादमुक्त भारत’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी माओवाद फोफावण्यापासून तर माओवाद्यांना संपवण्यासाठी केल्या गेलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देण्यात आली. याशिवाय माओवादमुक्त भारत घडविण्यासाठी यापुढील आव्हानांचा ऊहापोह करण्यात आला. आपसातील समन्वय आणि सकारात्मक संवादातून हे शक्य असल्याचे मान्यवर वक्त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील हे नागपूरवरून आभासी पद्धतीने, तसेच पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) योगेश कुमार, पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच माओवाद विषयाचे अभ्यासक, जेष्ठ लेखक व पॉलिसी अॅनालिस्ट पी.व्ही. रामना, जेष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पत्र व माहिती कार्यालय नागपूरचे सौरभ खेकडे व देवप्रकाश दुबे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माओवादाची उत्पत्ती, विस्तार, सद्यस्थिती, माओवाद्यांची कार्यपद्धती, त्यांची विचारसरणी, तसेच माओवादविरोधी अभियानादरम्यान येणारी आव्हाने यांची माहिती देऊन प्रमुख वक्त्यांनी त्यांचे अनुभव, अभ्यासपूर्ण निरीक्षणे आणि महत्त्वपूर्ण विचार मांडले. माओवादी संपले, पण माओवाद संपला का? असा सवाल उपस्थित करत पत्रकार कार्तिक लोखंडे यांनी शिल्लक असलेल्या माओवादातून कोणत्या पद्धतीने विकासात्मक कामात अडथळे आणले जातील याचा अंदाज व्यक्त केला.

विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांनी सशस्त्र माओवादाच्या अस्तानंतर भविष्यात पोलीस दलापुढे असणारी आव्हाने या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार, पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनीही या संवादातून गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी संघर्षाचा प्रवास, पोलीस दलाने स्वीकारलेल्या विविध रणनीती, सुरक्षा यंत्रणांचे योगदान, स्थानिक नागरिकांचा सहभाग तसेच विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून माओवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न यावर प्रकाश टाकला.

गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपूष्टात आला असून भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दल, शासन, माध्यमे आणि समाजातील विविध घटक यांच्यात समन्वय व सकारात्मक संवाद असणे आवश्यक असल्याचे या कार्यक्रमप्रसंगी अधोरेखित झाले. या अनुषंगाने माओवादविरोधी अभियानात आलेले अनुभव, यशस्वी कार्यपद्धती आणि भविष्यातील आव्हानांवर यावेळी वरिष्ठ अधिकारी, तज्ञ व पत्रकार बांधवांच्या वतीने विचारमंथन करण्यात आले. पत्रकारांनी आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. माओवादाच्या समस्येकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातूनही पाहण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या वार्तालाप कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांना माओवादाच्या समस्येची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यासोबतच नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची पाश्र्वभूमी, सद्यस्थिती आणि आगामी वाटचाल याबाबत सविस्तर जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली. यासोबतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून माओवादविरोधी अभियानात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या 214 शहीद जवानांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.