Home दैनंदिन बातम्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने पीएच.डी.पर्यंत गाठली मजल

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने पीएच.डी.पर्यंत गाठली मजल

कमलापूरच्या मातीतून ज्ञानाचा हिरा

गडचिरोली : निसर्गाचे वैभव, वन्यजीवांची समृद्धी आणि आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या कमलापूर या छोट्याशा गावाने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाच्या इतिहासात एका सुपुत्राने आपल्या कर्तृत्वाने अभिमानाचे नवे पान जोडले आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, अनेक अडचणी आणि संघर्षावर मात करत प्रा.सत्यनारायण पुसाला यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून प्राणिशास्त्र विषयात पीएच.डी.(आचार्य) पदवी संपादन केली आहे.

विशेष म्हणजे, कमलापूर गावातील पहिले एम.एस्सी. पदवीधर ठरण्याचा मान मिळवल्यानंतर आता गावातील पहिले डॉक्टरेटधारक होण्याचा ऐतिहासिक बहुमानही त्यांनी पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कमलापूर गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.

डॉ.सत्यनारायण पुसाला यांच्या संशोधनाचा विषय मध्य भारतातील कॅटफिश (मत्स्य) जैवविविधता, डीएनए बारकोडिंग आणि आण्विक वंशविकास (Molecular Phylogeny) असा होता. आधुनिक आण्विक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना डॉ.मंदार पैगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित मोहसीनभाई झवेरी महाविद्यालय, देसाईगंज (वडसा) येथे प्राणिशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

प्रत्येक मोठ्या यशामागे संघर्षाची एक कहाणी असते. डॉ.पुसाला यांच्या यशस्वी प्रवासाची पाळेमुळे कमलापूरच्या मातीत आणि येथील शैक्षणिक संस्कारांत रुजलेली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रमशाळेत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची पायाभरणी झाली. महाराष्ट्रातील पहिली आश्रमशाळा म्हणून ओळख असलेल्या या संस्थेने आजवर अनेक विद्यार्थ्यांना घडवून विविध उच्च पदांपर्यंत पोहोचविले आहे. याच शाळेतून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या सत्यनारायण पुसाला यांनी आज डॉक्टरेटपर्यंत मजल मारत आपल्या शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढविला आहे. एका छोट्याशा गावातील आश्रमशाळेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज संशोधनाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे.

या यशस्वी प्रवासात त्यांच्या आई-वडिलांसह भाऊ आणि पत्नी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मोहसीनभाई झवेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र अरेकर, सहकारी प्राध्यापक आणि मित्रपरिवार यांनीही त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द या बळावर त्यांनी हे यश संपादन केले.