गडचिरोली : विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसहय करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. यासंदर्भात आयोजित बैठकीत 232 निरोधारांना अर्थसहाय्यासाठी पात्र ठरविण्यात आले.
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी 4 नोव्हेंबर, 2026 रोजी संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक घेण्यात आले.समितीचे अध्यक्ष यश कोंडावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वसंत गावतुरे, दीपक भारसागडे, संदीप जीवन शिंगाडे, दत्तु माकोडे, प्रमोद सुधाकर उमरगुंडावार, तसेच गटविकास अधिकारी अनिकेत पाटील हे शासकीय सदस्य उपस्थित होते.
या सभेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या एकूण 150 प्राप्त प्रकरणांपैकी 140 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 10 प्रकरणे नामंजूर करण्यात आली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 67 प्राप्त प्रकरणापैकी 64 प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या एकूण 21 प्राप्त प्रकरणांपैकी 16 प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या 17 प्रकरणापैकी 12 प्रकरणे मंजूर करण्यात आली.
सदर सभेकरिता नायब तहसीलदार (सं.गां.यो.) डी.ए. ठाकरे, सहायक महसूल अधिकारी अमोल नन्नावरे, महसूल सहायक एस.जे. नरुले यांनी विशेष सहाय्य योजनेची ऑनलाईन प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले.
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र लाभार्थ्याचे अर्ज ग्राम महसुल अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतर आपले सेवा केंद्र चालकामार्फत ऑनलाईन तहसील कार्यालयास सादर करण्याचे आवाहन तहसीलदार सागर कांबळे यांनी केले आहे.
































