Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीत होणार देशपातळीवरील भव्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव

गडचिरोलीत होणार देशपातळीवरील भव्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव

समारोपाला राज्यपाल, मुख्यमंत्री येणार

जिल्हा क्रीडा संकुलात कार्यक्रमासाठी असे तीन डोंब उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे

गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत येत्या १३ ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलावर होणाऱ्या या महोत्सवाच्या, तसेच 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या देशपातळीवरील मुख्य शासकीय सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, आणि केंद्रीय तथा राज्य मंत्रीमंडळातील काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.

मुख्य कार्यक्रमासाठी सुमारे 8 ते 12 हजार नागरिकांची उपस्थिती राहण्याची शक्यता असून त्यादृष्टिने प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. त्यानुसार विविध सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक व्यवस्था पूर्वचाचणीसह वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त 11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देणे आणि त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक सक्षमीकरण करणे यावर या सप्ताहात भर देण्यात येणार आहे.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन आणि पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने 15 नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून घोषित केला आहे. आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे योगदान, संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा आणि अस्मिता यांचे जतन व संवर्धन करून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सांस्कृतिक महोत्सव व मुख्य सोहळ्याच्या व्यवस्थांचा आढावा

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी सांस्कृतिक महोत्सवासाठी कार्यक्रमस्थळावरील सुविधा, कलाकारांची निवास व भोजनव्यवस्था, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वीजपुरवठा याबाबत विभागनिहाय नियोजनाचा आढावा घेतला. महोत्सवांतर्गत 13 व 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राज्यभरातून सुमारे 1200 कलाकार अपेक्षित आहेत. त्यांच्या निवासासाठी शासकीय वसतिगृहे, मंगल कार्यालये आणि हॉटेल्समधील व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळी व वाहनतळांवर महिलांसाठी 50 आणि पुरुषांसाठी 50 अशी एकूण 100 फिरती शौचालये उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगर परिषदेमार्फत पुरेसे पाणी, कचराकुंड्या, नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक, भोजन व आरोग्य सुविधांचे नियोजन

नागरिकांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी स्वतंत्र वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनचालकांना संबंधित वाहनतळांचे गुगल लोकेशन आगाऊ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चंद्रपूर, अहेरी, भामरागड, चिमूर आणि अन्य भागांतील लाभार्थी व नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त बससेवा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भोजनाची गुणवत्ता व स्वच्छता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यक्रमस्थळी तात्पुरता वैद्यकीय कक्ष, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आल्या. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, तसेच शासकीय छायाचित्रकार व कॅमेरामनसाठी छायाचित्रण आणि चित्रीकरणाची योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.

सणासुदीच्या सुट्ट्यांच्या कालावधीतही तयारीची कामे वेळेत पूर्ण होतील, याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था आगाऊ पूर्ण करून त्यांची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.

सेवा सप्ताहात योजनांचे लाभवाटप व सांस्कृतिक उपक्रम

सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, दि.11 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे, तर 12 नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदांच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल.

13 नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेटअंतर्गत धनादेशांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनमन योजना आणि अन्य शासकीय योजनांचे लाभ देण्यात येतील. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासह स्वयंरोजगार, व्यवसाय, कृषिपूरक उद्योग, सिंचन आणि उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

14 नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करण्यात येणार आहे. सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करून आदिवासी देव-देवता, पूजापद्धती, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविण्यात येईल. याच दिवशी गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

15 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीतील देशस्तरीय मुख्य सोहळ्यासोबतच राज्यातील सर्व जिल्हा आणि अनुसूचित जमातीबहुल तालुका मुख्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा तसेच अन्य आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात येईल. पद्म पुरस्कारप्राप्त आदिवासी व्यक्ती, सामाजिक नायक, समाजसेवक, बुद्धिजीवी, आदिवासी संत-महंत तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व समूहांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदिवासी महापुरुषांच्या नावाने उद्याने, चौक आणि रस्त्यांचे नामकरण तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतनाचे उपक्रमही राबविण्यात येतील.

आरोग्य तपासणी व पोषणविषयक मार्गदर्शन

16 नोव्हेंबर रोजी आदिवासी बांधवांसाठी विशेष सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावतीकरण, वनपट्टेधारकांना विविध योजनांचे लाभ मिळवून देणे, शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि पात्र लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सहाय्य करण्यात येईल. शेतकरी नोंदणी, पीकविमा, कृषी विभागाच्या ऑनलाइन सेवा आणि डिजिटल माध्यमातून शासकीय सेवा मिळविण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

17 नोव्हेंबर रोजी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदाब व मधुमेह तपासणी, सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व तपासणी, तसेच माता-बाल आरोग्य आणि पोषणविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. पोषणबाग, परसबाग, पौष्टिक तृणधान्ये, कडधान्ये आणि स्थानिक अन्नपिकांचे आहारातील महत्त्व याबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.

शिक्षण, रोजगार व आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन

18 नोव्हेंबर रोजी आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांनी सेवा सप्ताहाचा समारोप होणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र, व्यावसायिक शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, अप्रेंटिसशिप आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती देण्यात येणार आहे.

यासोबतच पात्र लाभार्थ्यांना कृषी, पशुसंवर्धन आणि कौशल्य विकास योजनांची माहिती देण्यात येईल. बँक खाते, डिजिटल व्यवहार, आर्थिक साक्षरता, सेंद्रिय शेती, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि बाजारपेठ जोडणी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमधून आदिवासी बांधवांना विविध शासकीय सेवांची माहिती आणि योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.