Home दैनंदिन बातम्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या देखभालीवर मार्गदर्शन

जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या देखभालीवर मार्गदर्शन

नवजात शिशू सप्ताहानिमित्त आयोजन

गडचिरोली : अकाली जन्मलेल्या, जन्मतः कमी वजन असलेल्या आणि आजारी नवजात बालकांची विशेष काळजी, तसेच रुग्णालयातून घरी गेल्यानंतर त्यांची नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करण्याचे महत्त्व यावर जिल्हा महिला व बाल रुग्णालयात गरोदर आणि प्रसुत मातांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके यांच्या हस्ते झाले.

15 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पाळण्यात येणाऱ्या सप्ताहाची यंदाची संकल्पना ‘लहान बाळे, मोठी क्षमता; त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ अशी आहे. किशोरवयापासूनच मुलींच्या आरोग्य आणि पोषणाकडे लक्ष देण्याचे महत्त्व डॉ.किलनाके यांनी सांगितले. प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा सकस आहार, नवजात बालकांची देखभाल, केवळ स्तनपानाचे महत्त्व आणि माता व बालकाच्या काळजीत कुटुंबाचा सहभाग याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

जन्मानंतरचे पहिले 28 दिवस बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील असतात, असे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.संजय करपते यांनी सांगितले. या काळात बालकातील धोक्याची लक्षणे ओळखणे, गरजेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा घेणे आणि रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर बालकाच्या आरोग्य स्थितीनुसार पुनर्तपासणी करणे याविषयी त्यांनी माहिती दिली.

थंडीच्या दिवसांत लहान व आजारी बालकांना उबदार ठेवणे, नियमित लसीकरण आणि जन्मजात दोष असलेल्या बालकांसाठी जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामार्फत (DEIC) उपलब्ध सेवांविषयीही कार्यक्रमात माहिती देण्यात आली. यासाठी दृकश्राव्य आणि माहितीपर साहित्याचा वापर करण्यात आला.

यावेळी डॉ.नीलकंठ मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कन्नमवार, सहाय्यक अधिसेविका कविता पोतराजवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, परिचर्या प्रशिक्षणार्थी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतिज्ञा रामटेके यांनी केले.