गडचिरोली : विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी पूर्ण झालेली तसेच प्रगतिपथावर असलेली कामे, त्यांची सद्यस्थिती आणि अंमलबजावणीतील अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये चारा लागवड, नाला खोलीकरण, कॅटल शेल्टर, अंगणवाडी बांधकाम, बोडी दुरुस्ती, फॉरेस्ट टँक, रोपवाटिका, कक्ष सीमा सफाई आणि इतर विविध कामांचा समावेश होता.
मग्रारोहयोचे विकसित भारत जी रामजी अभियानात रूपांतर झाल्यानंतर 375 प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वय व अभिसरणातून कामे करावीत. त्यामुळे कामांना गती मिळण्यासोबतच एकाच कामाची पुनरावृत्ती टाळता येईल, असे निर्देश आमदार डॅा.नरोटे यांनी दिले. तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामांचाही विविध योजनांशी समन्वय साधून समावेश करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
युक्तधारा पोर्टलच्या माध्यमातून सर्व कामांची माहिती एकाच सामायिक प्रणालीत उपलब्ध होत असून प्रत्येक कामाला स्वतंत्र आयडी देऊन जिओटॅगिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे कामांमधील दुबारपणा टाळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोजगार हमी योजनेच्या कामांदरम्यान प्रत्यक्ष क्षेत्रभेटीत मजुरांच्या हजेरीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला. मजुरांसाठी हजेरी व इतर प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. विशेषतः धानोरा तालुक्यातील राजोलीसारख्या दुर्गम व दुर्लक्षित गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार कामांचे नियोजन करून नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही आमदारांनी दिले.
पुढील आढावा बैठकीस प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागाची अद्ययावत माहिती व आवश्यक गृहपाठ करून उपस्थित राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे (राज्य), उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज (जि.प.), भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, उपवनसंरक्षक (प्रादेशिक व सामाजिक वनीकरण), विधानसभा क्षेत्रातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता (सिंचन) इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
































