गडचिरोली : केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यातील नवेगावने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातील पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ होण्याचा मान मिळविला आहे. गावातील 105 वीज ग्राहकांनी आपल्या घरांवर एकूण 424.22 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती पॅनल लावून स्वच्छ व अक्षय ऊर्जेच्या वापराला चालना दिली आहे. जिल्ह्यातील पात्र पाच गावांमध्ये झालेल्या स्पर्धेत सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापित केल्यामुळे नवेगावची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.
मॅाडेल सोलर व्हिलेजचा बहुमान मिळालेल्या नवेगावला विकासासाठी एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान आणि अतिरिक्त सौर प्रकल्पांसाठी 63.12 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे.
नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) निर्देशानुसार पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज विकसित करण्यासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधून जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली व कुनघाडा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी, गडचिरोली तालुक्यातील नवेगाव आणि वडसा तालुक्यातील कुरूड या गावांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत या गावांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. ही स्पर्धा 17 सप्टेंबर 2025 ते 16 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात आली. गावागावांत अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि नागरिकांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.
सौर ऊर्जा निर्मितीत नवेगावची आघाडी
स्पर्धेच्या कालावधीत नवेगाव येथील 105 वीज ग्राहकांनी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत एकूण 424.22 किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केले. या कामगिरीमुळे नवेगावने स्पर्धेतील इतर चार गावांच्या तुलनेत सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता उभारली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नवेगावची जिल्ह्यातील मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड केली आहे.
सौर ऊर्जेच्या वापरामुळे पारंपरिक वीज पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्यास, वीज खर्चात बचत करण्यास आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. नवेगावची ही कामगिरी जिल्ह्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान
मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड झाल्यामुळे नवेगावला केंद्र शासनाच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक कोटी रुपयांचे आर्थिक प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानातून गावातील विविध शासकीय व निमशासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले जात आहे.
याअंतर्गत 17 ठिकाणी एकूण 106 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 63.12 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सदर अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी ते सादर करण्यात आले आहे.
या प्रकल्पांमुळे गावातील सार्वजनिक संस्थांमध्येही सौर ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शासकीय व निमशासकीय इमारतींच्या वीज खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे.
अक्षय ऊर्जेच्या प्रसाराला नवी दिशा
नवेगावची मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून झालेली निवड ही जिल्ह्यातील अक्षय ऊर्जा वापराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. घरगुती सौर प्रकल्पांच्या उभारणीनंतर आता सार्वजनिक इमारतींवरही सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असल्याने गावात सौर ऊर्जेचा वापर अधिक व्यापक होण्यास चालना मिळणार आहे.
नागरिकांचा सहभाग, पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी आणि जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेच्या माध्यमातून नवेगावने मिळविलेले हे यश गडचिरोली जिल्ह्यातील इतर गावांनाही सौर ऊर्जा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.
































