आरमोरी : आरमोरी येथे खरेदी विक्री समितीच्या माध्यमातून रब्बी हंगामातील मका खरेदीचा शुभारंभ दि.२९ रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामात केल्या जाणाऱ्या या मका खरेदीमुळे आरमोरी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय दराने मका विक्री करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
आरमोरी तालुक्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सदर मका, खरेदी विक्री समितीच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केला जातो. दरवर्षी हा शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला मका शासनाकडे पाठवला जातो. या मका उत्पादक शेतकऱ्यांना मका विक्रीचे केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी खरेदी विक्री समितीने पुढाकार घेतला. यावर्षी या केंद्राचा शुभारंभ तहसील कार्यालयाजवळील आदिवासी विकास विभागाच्या गोडाऊनमध्ये शुभारंभ करण्यात आला.
या शुभारंभप्रसंगी मका उत्पादक शंकरनगर येथील शेतकरी विष्णुपत गाईन यांचा मका केंद्रामध्ये प्रथम क्रमांक लागल्याने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन आ.कृष्णा गबजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष मनोज मने, उपाध्यक्ष दीपक निंबेकर, बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, पुरवठा निरीक्षक खांडवे, खरेदी विक्री समितीचे व्यवस्थापक अक्षय माकडे, ग्रेडर सचिन फाये आणि इतर मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.