गडचिरोली : गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष राहिलेल्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने गडचिरोली-चिमूर क्षेत्रात आपला उमेदवार उतरवणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
भारतीय जनता पक्ष हा भांडवलदार समर्थक आणि संविधानविरोधी विचार पेरणारा पक्ष असल्याचा आरोप करत तो सत्तेत आल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल. त्यामुळे मागील निवडणुकीत आपण महाविकास आघाडीसाठी काम केले. यावेळी सुद्धा त्यांना मदत करण्याची भूमिका आहे. परंतु महाविकास आघाडी आंबेडकरी मतांचा सन्मान करत नसून आपल्याच तोऱ्यात आहे. तरीही 20 मार्चपर्यंत पक्षाचे अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांच्या आदेशानुसार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चर्चेसाठी दार खुले ठेवणार आहे, मात्र तसे न झाल्यास ताकदीने उमेदवार उतरविणार, असे फुटाणे यांनी सांगितले.
शिक्षण, आरोग्य, बेरोजगार, शेतकरी, कामगार व विद्यार्थी यांच्या मुद्यांना घेऊन निवडणुकीत उतरणार असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शहर सचिव नागसेन खोब्रागडे, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, कुणाल कोवे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक बारीकराव मडावी, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाळके, निवृत्त एएसआय शंकर चिंतुरी, महिला आघाडीचे जिल्हा सचिव शहराध्यक्ष शोभा खोब्रागडे, शहराध्यक्ष विद्या कांबळे, संघटक आवळती वाळके, शहर सचिव प्रतिमा करमे, एएसआय घनश्याम मडावी उपस्थित होते.