अहेरी : आदिवासी विद्यार्थी संघाची सत्ता असलेल्या अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांनी कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजवाड्यात स्वतःसह सहा नगर सेवकांना सोबत घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन आणि नगर पंचायतीत विकासात्मक कामांची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘घडी’ हातावर बांधली. पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये न.पं.उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, आविसंचे गटनेता विलास गलबले, बांधकाम सभापती महेश बाक्केवार, महिला व बालकल्याण सभापती मीना ओंडरे, गटनेता शिवसेना (उबाठा) विलास सिडाम, नगर सेविका आविसं ज्योती सडमेक यांच्यासह आणखी एका नगरसेवकाचा समावेश आहे.
येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याअनुषंगाने अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते. आविसं आणि काँग्रेसचे नेते असलेले माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांच्यासाठी हा धक्का असल्याचे बोलले जाते.