आरमोरी : नवरात्रीचे साहित्य खरेदी करण्यासाठी आरमोरीकडून देसाईगंजला दुचाकीने जाण्यासाठी निघालेल्या मायलेकाची चितळाशी धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान अशाच प्रकारे एका माकडाच्या उडीमुळे अपघातग्रस्त इसमाला गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन बंद असल्याने 6 हजारांचा भुर्दंड सहन करत खासगी रुग्णालयात सीटी स्कॅन करावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथील रहिवासी मयूर सुरेश सुरपाम (22 वर्ष) आणि सुरेश्वरी सुरेश सुरपाम (49 वर्ष) हे मायलेक नवरात्रीच्या साहित्य खरेदीसाठी देसाईगंजकडे निघाले होते. दरम्यान, ईटियाडोहच्या लहान कालव्याजवळ रस्त्यालगतच्या जंगलातून धावत आलेल्या एका चितळाने रस्ता ओलांडण्यासाठी झेप घेतली. त्याचवेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सुरपाम मायलेकांशी त्याची धडक झाली. या अनपेक्षित घटनेने दोघेही खाली कोसळून जखमी झाले. या अपघातानंतर जखमी मायलेकांना तातडीने उपचारासाठी आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वनविभागाने मदत द्यावी- घोडाम
या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांना दिली. रस्त्यांवरून प्रवास करताना वन्यप्राण्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांना मदतीसाठी वनविभागाकडे कोणतीही तरतूद नाही. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा, अशी मागणी दिलीप घोडाम यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शालिक पत्रे, सुधीर राऊत, रितेश पिलारे, सुरेश सुरपाम तसेच अन्य नातेवाईक उपस्थित होते.
































