Home दैनंदिन बातम्या प्रभावी उपाययोजनांमुळे हिवतापावर यावर्षी नियंत्रण; मृत्यूसंख्येतही घट

प्रभावी उपाययोजनांमुळे हिवतापावर यावर्षी नियंत्रण; मृत्यूसंख्येतही घट

39 टक्क्यांनी घटली रुग्णांची संख्या

हिवतापाच्या डासांना मारण्यासाठी घरोघरी अशी फवारणी करण्यात आली

गडचिरोली : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे हिवतापावर (मलेरिया) नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. जिल्हा हिवताप अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हिवताप चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर, वार्षिक परजीवी निर्देशांक (API) आणि हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.

हिवताप पॉझिटिव्हिटी दरात मोठी घसरण

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत हिवतापाचा चाचणी पॉझिटिव्हिटी दर 0.49 टक्के इतका नोंदविला गेला होता. यंदा जानेवारी ते सप्टेंबर 2026 या कालावधीत तब्बल 12 लाख 19 हजार 783 विक्रमी चाचण्या करण्यात आल्या, यामध्ये मागच्या वर्षीच्या सप्टेंबर पर्यंतच्या 6,411 बाधितांच्या संख्येच्या तुलनेत यावर्षी 3 हजार 940 पर्यंत रुग्णसंख्या खाली आली आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी दर 0.49 वरून घसरून 0.33 टक्क्यांवर आला आहे.

वार्षिक परजीवी निर्देशांकात (API) लक्षणीय सुधारणा

जिल्ह्यात सातत्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे वार्षिक परजीवी निर्देशांकात (API) सातत्यपूर्ण घट दिसून येत आहे. वर्ष 2021 मध्ये जिल्ह्याचा एपीआय 10.97, वर्ष 2022 मध्ये 8.17, वर्ष 2024 मध्ये 5.90, तर वर्ष 2025 मध्ये 6.42 इतका नोंदवला गेला होता. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर 2026 या कालावधीत प्रभावी कीटक नियंत्रण आणि गतिमान रुग्ण शोध मोहिमेमुळे जिल्ह्याचा सरासरी API 4.62 पर्यंत खाली आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

सलग दोन महिने शून्य मृत्यू

आरोग्य यंत्रणेमार्फत वेळेवर अचूक निदान आणि तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून दिल्याने हिवतापाचे मृत्यू रोखण्यात मोठे यश मिळाले आहे. सन 2024 व 2025 मध्ये प्रत्येकी 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर 2026 मध्ये ही संख्या घटून ६ वर आली आहे. अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 या सलग दोन महिन्यांत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

12 लाखांहून अधिक हिवताप चाचण्या

हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य विभागाने शोधमोहीम अधिक गतिमान केली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2026 दरम्यान 5 लाख 7 हजार 675 रक्त नमुन्यांची सूक्ष्मदर्शक तपासणी (Blood Smears) आणि 7 लाख 12 हजार 108 आरडीके (RDK) अशा एकूण 12 लाख 19 हजार 783 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. दुर्गम व संवेदनशील भागांत ताप रुग्ण आढळताच जागेवरच जलद चाचणी करून तत्काळ योग्य औषधोपचार केले जात आहेत.

अतिजोखमीच्या गावात कीटकनाशक फवारणी

डासांच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी 10 जून ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान पहिल्या फेरीत घरातील कीटकनाशक फवारणी (IRS) मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये निवडलेल्या सर्व 1 हजार 195 गावांमध्ये 1 लाख 60 हजार 956 घरांमध्ये फवारणी पूर्ण करण्यात आली. यामुळे 5 लाख 9 हजार 58 नागरिकांना सुरक्षित संरक्षण कवच मिळाले आहे.
फोकल राऊंड मध्ये नव्याने वापरण्यात आलेल्या अल्फा सायपरमेथ्रीन कीटकनाशकाच्या जैविक चाचणीत फवारणीनंतर 24 तासांत डास नष्ट झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

घरोघरी सर्वेक्षण, आश्रमशाळांध्ये तपासणी व जनजागृती उपक्रम

दुर्गम व अतिसंवेदनशील भागांत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन ताप रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील 150 आश्रमशाळांमधील 39 हजार 663 विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी करून बाधित आढळलेल्या 371 विद्यार्थ्यांना त्वरित उपचार करण्यात आले. रोजगारासाठी बाहेरगावी गेलेल्या व परत आलेल्या 14 हजार 891 स्थलांतरित नागरिकांचे 100 टक्के स्क्रिनिंग करण्यात आले आहे. तसेच आठवडी बाजाराचा दिवस, गावागावांत दवंडी/माईकिंग, आरोग्य मेळावे आणि शाळांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क केले जात आहे.

पुजारी व वैदूंना जिल्हा परिषदकडून प्रोत्साहन मानधन

दुर्गम भागातील तापाचा रुग्ण वेळेत शासकीय तपासणीसाठी पाठवल्यास स्थानिक पुजारी व वैदूंना प्रतिरुग्ण 15 रुपये आणि तपासणीत हिवताप आढळल्यास 200 रुपये प्रोत्साहन मानधन दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 15,250 रुपये 101 पुजाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

किटकनाशक प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्यांचे वाटप

डासांच्या चावण्यापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील आश्रमशाळा, वसतिगृहे आणि तिसंवेदनशील गावांमधील नागरिकांना 1,16,372 कीटकनाशक प्रक्रिया केलेल्या मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे.

उपचार पूर्ण करणाऱ्या रुग्णांना बुडित मजुरी

हिवतापबाधित रुग्णांनी उपचाराचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा यासाठी आरोग्य विभागाकडून आर्थिक साहाय्य दिले जात आहे. उपचार पूर्ण करणाऱ्या प्रत्येक रुग्णाला 500 रुपये बुडित मजुरी थेट बँक खात्यात दिली जात असून, आतापर्यंत 566 रुग्णांना एकूण 2 लाख 83 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

नागरिकांनी डासांची पैदास रोखण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, तसेच मच्छरदाणीचा रात्री झोपताना न चुकता नियमित वापर करावा. थंडी वाजून ताप, डोकेदुखी अथवा अंगदुखी जाणवल्यास घरगुती किंवा पारंपरिक उपाय न करता तात्काळ जवळच्या आशा स्वयंसेविका, उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची मोफत तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घ्यावेत.

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना आवाहन

जिल्ह्यातील स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सुद्धा हिवताप तपासणी किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांनी प्रत्येक ताप रुग्णांची हिवताप तपासणी करावी किंवा त्यांना शासकीय संस्थेत संदर्भित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सामूहिक प्रयत्नांमुळे हिवतापावर नियंत्रण शक्य – जिल्हाधिकारी पंडा

गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि दुर्गम जिल्ह्यात हिवतापाचा संसर्ग आणि मृत्यू नियंत्रणात आणणे हे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनाचे फलित आहे. विक्रमी चाचण्या, अतिजोखमीच्या भागांत कीटकनाशक फवारणी आणि पुजारी-वैदूंना सोबत घेऊन राबवलेली मोहीम गेमचेंजर ठरली आहे. सलग दोन महिने शून्य मृत्यू ही दिलासादायक बाब असली, तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने थंडी-ताप जाणवल्यास तात्काळ शासकीय केंद्रात जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

समर्पण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची फलश्रुती : सीईओ गाडे

आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अगदी दुर्गम पाड्यांपर्यंत पोहोचून केलेल्या अविरत परिश्रमांमुळेच पॉझिटिव्हिटी दर आणि एपीआय (API) मध्ये ही लक्षणीय घट साध्य झाली आहे. रुग्णांना औषधोपचार पूर्ण करण्यासाठी दिली जाणारी 500 रुपयांची बुडित मजुरी, आश्रमशाळांमधील विशेष तपासणी आणि औषधबाधित मच्छरदाण्यांचे वाटप यांसारख्या योजना तळागाळात प्रभावीपणे पोहोचल्या आहेत. खाजगी डॉक्टरांनीही प्रत्येक ताप रुग्णाची मलेरिया चाचणी करावी किंवा त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवावे. नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साचू न देता आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जि.प.चे सीईओ सुहास गाडे यांनी केले आहे.