न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करा, अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन

आ.मसराम यांची आंदोलनाला भेट

गडचिरोली : सीटू संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांसाठी काल जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सीटुचे आंदोलन सुरू असताना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांनी आंदोलनाला भेट देऊन त्या मागण्यांसाठी मी प्रयत्न करेल, असे सांगितले. यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडीवरील महिला या कर्मचारी आहेत, त्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला. त्याची अंमलबजावणी करावी, गुजरातच्या अहमदाबाद हायकोर्टाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना कर्मचारी समजून वर्ग 3 व 4 चा दर्जा देण्यात यावा, दिवाळी भेट म्हणून जाहीर केलेले 2000 रुपये त्वरित देण्यात यावे, लाडक्या बहिणींचे फॅार्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी महिलांकडे देण्यात आली होती व फॅार्म भरण्याचा मेहनताना म्हणून प्रत्येक फॅार्ममागे 50 रुपये जाहीर केले होते ते देण्यात यावे, लाडकी बहिण योजनेत घोषित केल्यानुसार प्रतिमहिना 2100 रुपये देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले.

या आंदोलनप्रसंगी रमेशचंद्र दहिवले, अमोल मारकवार, राजेश पिंजरकर, शारदा लेनगुरे, ललीता चौधरी, विमल गावडे, सुशिला कर्णेवार, संध्या खनके, सुरेखा तितरे, प्रणिता लांडगे, शोभा राहुलकर, वंदना जीवणे, सुनंदा बावणे, विठाबाई भट, माया शेडमाके, मायाबाई नैनुरवार, ललीता केदार, वर्षा तिजारे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.