Home क्राईम डिझेलच्या साठेबाजीवर आष्टी पोलिसांची कारवाई, एकाला अटक

डिझेलच्या साठेबाजीवर आष्टी पोलिसांची कारवाई, एकाला अटक

टाक्यांसह 7.58 लाखांचा माल जप्त

गडचिरोली : जिल्ह्यात आधीच डिझेलचा तुटवडा असताना साठेबाजी करून अनधिकृतपणे चढ्या दराने डिझेल विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे आष्टी पोलिसांनी हाणून पाडले. या कारवाईत विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरसह त्यातील डिझेलच्या टाक्या असा 7 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात छुप्या पद्धतीने डिझेल व पेट्रोल विक्री तथा वाहतुक करण्याचा प्रयत्न रोखण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी दिले आहेत. त्यानुसार आष्टी पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान एका विना क्रमांकाच्या संशयित ट्रॅक्टरमधून काही ड्रम वाहून नेले जात असल्याचे दिसले. हा ट्रॅक्टर गांधीनगर, आनंदग्राम कडून मुलचेराच्या दिशेने जात होता. पोलीस पथकाने वाहन थांबवून तपासणी केली. त्यात 2 लोखंडी ड्रममध्ये प्रतिड्रम 200 लिटर याप्रमाणे 400 लिटर डिझेल (किंमत 39,720 रुपये), 5 निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक बॅरेलमध्ये एकूण 1199 लिटर डिझेल (किंमत 1,19,060 रुपये) आढळले.

सदर डिझेल वाहतुकीबाबत ट्रॅक्टर चालक किशोर बिश्वास याच्याकडे अधिक विचारपूस केले असता त्याच्याकडे डिझेल वाहतूक संबंधाने कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना किंवा संबंधीत विभागाची परवानगी नसल्याचे दिसून आले. यावरून आष्टी पोलिसांनी सदर डिझेल साठ्यासह अवैधपणे डिझेल वाहतुकीकरीता वापरण्यात आलेला ट्रॅक्टर व ट्रॉली (अंदाजे किंमत 6,00,000 रुपये) असा एकूण 7,58,780 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त केला.

हे डिझेल कोणत्या पेट्रोल-डिझेल पंपावरून आणले, अशा पद्धतीने ड्रमममध्ये ते कसे दिले याचा तपास करून पेट्रोल पंप चालकावरही कारवाई होणार आहे. पुढील तपास आष्टीचे पोनि.विशाल काळे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आष्टीचे प्रभारी अधिकारी पोनि.विशाल काळे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम व पोलीस अंमलदारांनी पार पाडली.