Home पब्लिक प्रॉब्लेम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्दमधून 25 दलघमी विसर्ग

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्दमधून 25 दलघमी विसर्ग

गडचिरोलीसह आरमोरी, वडसाला लाभ

गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्यावर विसंबून असलेल्या गडचिरोली शहरवासियांसह आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगर परिषदांमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्द धरणातून 40 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर आणि पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार गोसेखुर्दचे पाणी सोडण्यास परवानगी देण्यात आली. हे पाणी दोन दिवसात गडचिरोलीपर्यंत पोहोचून दि.5 पासून शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा केला जाणार आहे.

आज, दि.3 जूनला सकाळी 7 वाजता गोसेखुर्द प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गडचिरोली शहराचा पाणी प्रश्न गंभीर होत असल्याने नगराध्यक्षांसह पाणी पुरवठा सभापतींनी ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे गडचिरोलीप्रमाणेच आरमोरी आणि देसाईगंज या शहरांचाही पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची स्थिती पाहता सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी नगराध्यक्ष व सभापतींनी चर्चा करून 29 मे रोजी पाणी सोडण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला. त्यानंतर गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भंडाराचे जिल्हाधिकारी आणि गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची विनंती केली. गोसेखुर्द प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही लगेच या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे सादर केला.

दरम्यान, 1 जून रोजी भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकारी भंडारा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली. सदर प्रस्ताव 1 जूनला अधीक्षक अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्या प्रस्तावास 2 जून रोजी मंजुरी देण्यात आली असून, 3 जूनला सकाळी 7 वाजतापासून गोसेखुर्द धरणातून 25.00 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश काढण्यात आला.

गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीला सोडल्यानंतर ते अडविण्यासाठी नगर परिषदेकडून वैनगंगा नदी पात्रात माती व रेती टाकून तात्पुरत्या बंधाऱ्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. 3 जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

टप्प्याटप्प्याने एकूण 25 दलघमी पाणी सोडणार

आजपासून 40 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गमध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ होऊ शकते. गोसेखुर्द धरण प्रकल्प क्षेत्रातून 30 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येणार आहे. नदीपात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे. सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना त्वरित सूचित करण्याच्या सूचना गोसेखुर्द प्रकल्प व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले.