चामोर्शी : खरीप हंगामाची सुरुवात होत असतानाच पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांनी शेतकरी वर्गासमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. शेती मशागतीपासून पेरणी, सिंचन, वाहतूक आणि कृषी अवजारांच्या वापरापर्यंत सर्वच खर्च वाढणार असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी येथे एनएसयूआय आणि युवक काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली.
खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेली पेट्रोल-डिझेल दरवाढ ही शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका यावेळी करण्यात आली. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत असताना केंद्र शासनाने इंधन दरवाढ करून जनतेवर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना शेती मशागत, पेरणी, सिंचन आणि माल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात थेट वाढ असून त्यांचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रकार आहे असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. चामोर्शी येथील एचपी पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध करत पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर तात्काळ कमी करावेत, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केले. यावेळी पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेस चामोर्शीचे अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चिंचघरे, काँग्रेस मिडिया तालुका अध्यक्ष विजय लाड, पीपलदास सोयाम, सुभाष कोठारे, हेमंत कोवासे, तेजस कोंडेकर, आशिष घेर, संजय बुरांडे, ओमप्रकाश चौधरी, अभिषेक वाळके, अमन लाकडे, प्रफुल बारसागडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































