गडचिरोली : आपल्या कार्यशैलीने वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी कामांची बिले काढताना दुजाभाव केला, आपल्या मर्जीतील कंत्राटदारांचीच बिले काढली आणि बाकी कंत्राटदारांना मात्र ताटकळत ठेवले, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याची तक्रार करत त्यात सविस्तर मुद्दे नमूद केले आहेत.
सदर तक्रारीनुसार, निविदा प्रक्रिया, मर्जीतील कंत्राटदारांना कामे देणे, शासन नियम डावलून मजूह सहकारी संस्थांना सार्वजनिक कामे देणे, कामे न करता बिले काढणे आणि कामाची देयके काढतानासुद्धा विशिष्ट कंत्राटदारांची देयके काढून आपला खिसा भरण्याचे काम कार्यकारी अभियंत्याकडून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुर्गम, अतिदुर्गम भागात अनेक कंत्राटदारांनी रस्ते व इतर कामे केली. परंतू तीन वर्षांपासून अनेक कंत्राटदारांची बिले काढण्यात आलेली नाही. त्यामुळे कंत्राटदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ते कर्जाच्या खाईत सापडले आहेत. अशा स्थितीत उपलब्ध निधीनुसार सर्व कंत्राटदारांचे समाधान करणे आवश्यक असताना साखरवाडे यांनी विशिष्ट कंत्राटदारांचीच बिले काढून इतरांवर अन्याय केल्याचे कात्रटवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
विविध आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेल्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करून नवीन कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करावी, अशी विनंती अरविंद कात्रटवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
































