
गडचिरोली : शहरालगतच्या गुरवळा, हिरापूर, राखी आदी गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या भूमी अधिग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या शेतीजमिनी शासनाकडून अधिग्रहित केल्या जाणार असल्याच्या चर्चेमुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या भावना आणि समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते आणि गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी गुरवळा व हिरापूर येथे भेट देत ग्रामस्थांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.
या बैठकीत दोन्ही गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दांत मांडल्या. ते म्हणाले, शेती ही केवळ जमीन नसून आमची आई-माता, आत्मा आह. ती आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आमच्या परंपरेचा वारसा आणि वडिलोपार्जित जीवनाचा आधार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेतजमीन देणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी या बैठकीत मांडली.
ग्रामस्थांच्या भावना ऐकल्यानंतर मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले की, शेतकरी आणि गावकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय होऊ दिला जाणार नाही. आपण नेहमीच शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. तसेच या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. लवकरच गावातील शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनीही ग्रामस्थांना संबोधित करताना, जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भूमी अधिग्रहणासंदर्भातील शेतकऱ्यांच्या भावना, समस्या आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय्य मार्ग काढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याच त म्हणाल.
या आढावा बैठकीला भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, डॉ.भारत खटी, तालुकाध्यक्ष दतू सुत्रपवार, युवा नेते अनिल तिडके, राहुल पोरेड्डीवार, गुरवळाच्या सरपंच जया मंटकवार, हिरापूरच्या सरपंच शालिनी कुमरे, राखीच्या सरपंच ज्योती तलांडे, हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, पो.पा. कुसुम बारसागडे, शेतकरी विकास जेंगठे, रंजित निकुरे, देवानंद कुमरे, सुरज देशमुख, अड.बांबोळे, धनराज भांडेकर, परिक्षित बांबोळे, किशोर आयतुलवार, अनिल कोठारे, कात्याजी चिचघरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना आपले प्रश्न थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाली. त्यांच्या समस्यांवर सकारात्मक आणि न्याय्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.






























