गडचिरोली : कारवाफा येथील शासकीय आदिवासी शासकीय आश्रमशाळेला आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व शाळेतील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या विविध अडचणी समोर आल्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी कॉटची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आमदार मसराम यांच्याकडे केली.
मुलींच्या वसतिगृहातील काही खोल्यांमध्ये पंखे बंद असल्याचे आढळून आले. एका खोलीत चार गाद्यांवर आठ मुलींना झोपावे लागत असल्याची माहिती विद्यार्थिनींनी दिली.
आ.मसराम यांनी भोजन व्यवस्थेचीही पाहणी केली. यावेळी स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळाची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना जेवणासाठी स्वतंत्र व पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थी जेवणाचे ताट घेऊन आपल्या खोल्यांमध्येच जेवण करत असल्याचे समोर आले. तसेच विद्यार्थ्यांच्या हाताने बाथरुम-शौचालय स्वच्छ केले जात असल्याचे मसराम यांच्या निदर्शनास आले. दरम्यान रोजच्या जेवणात पोळी असताना मुला-मुलींना पोळी दिली जात नाही. आश्रमशाळेच्या समोरील गेटजवळ दुधाचे रिकामे पॉकेट व इतर कचरा टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचेही आमदारांच्या निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत आ.मसराम यांनी संबंधित व्यवस्थापनाकडून सुविधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व योग्य निवास तसेच दर्जेदार भोजन आणि आवश्यक मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेसचे धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, माजी उपसभापती नितीन राऊत, दिलीप घोडाम, शांताबाई परसे, विजय गन्ननवार, प्रभारी मुख्याध्यापक ठाकूर, अधीक्षक भारत कोरडे व अधीक्षिका उज्वला साव उपस्थित होते.
































