गडचिरोली : देशभरात राष्ट्रभावना जागृत करण्याच्या उद्देशाने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गडचिरोली शहरात भव्य ‘तिरंगा पदयात्रा’ उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन केलेल्या देशभक्तीपर घोषणांनी गडचिरोली शहर दुमदुमून गेले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.
या पदयात्रेत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते आणि आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘कर्तव्य कक्ष’ कार्यालयापासून कारगिल चौकापर्यंत तिरंग्याची शान
तिरंगा पदयात्रेची सुरुवात आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष कार्यालयापासून झाली. तेथून पदयात्रा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चामोर्शी रोड, गांधी चौक, त्रिमूर्ती चौक व बाजार चौक मार्गे कारगिल चौक येथे पोहोचली. कारगिल चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धातील शूर हुतात्म्यांच्या स्मृतींना उपस्थित मान्यवर व नागरिकांनी अभिवादन करून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
राष्ट्रप्रेम आणि हुतात्म्यांच्या स्मृती जागृत राहाव्यात : डॉ.अशोक नेते
समारोपप्रसंगी माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “संपूर्ण देशभरात नागरिकांमध्ये राष्ट्रभावना अधिक दृढ करण्यासाठी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने पाकिस्तान तसेच चीनसोबत झालेल्या युद्धांमध्ये आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाच्या बळावर विजय मिळवला. देशाच्या रक्षणासाठी अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर कारगिल युद्धात भारतीय जवानांनी अदम्य शौर्य आणि पराक्रम गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला. या शौर्याची आणि बलिदानाची आठवण प्रत्येकाच्या मनात सदैव जिवंत राहिली पाहिजे. राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि हुतात्म्यांप्रती आदराची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात सदैव जागृत राहणे आवश्यक आहे,’ असे डॅा.नेते यावेळी म्हणाले.
राष्ट्रभावना जागृत करत हुतात्म्यांना अभिवादन – आ.डॉ.नरोटे
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रभावना व राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीद व हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले.
देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले शहर
पदयात्रेदरम्यान देशभक्तीपर गीते, हातात डौलाने फडकणारे तिरंगे आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे पदयात्रेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
या तिरंगा पदयात्रेत मा.आ. डॅा.नामदेव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड.प्रणोती सागर निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, कि.मो.प्र. स. रमेश भुरसे, शहर अध्यक्ष तथा न.प. सभापती अनिल कुनघाडकर, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष मधुकर भांडेकर, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके, भाजपा तालुका अध्यक्ष दतु सुत्रपवार, शहर अध्यक्ष तथा न.प. सभापती सीमा कन्नमवार, अनिल पोहनकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, श्रीकांत पतरंगे, अविनाश विश्रोजवार, नरेश हजारे, किर्ती मासुरकर, लोमेश कोलते, साई सिल्लमवार यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
































