Home क्राईम जांभळीझोऱ्यात सुरू होता बोगस सुगंधित तंबाखू निर्मितीचा कारखाना

जांभळीझोऱ्यात सुरू होता बोगस सुगंधित तंबाखू निर्मितीचा कारखाना

15 लाखांच्या तंबाखूसह साहित्य जप्त

गडचिरोली : जिल्ह्यातील मद्यप्रेमींप्रमाणे खर्रा शौकिनांचे प्रमाण पाहता सुगंधित तंबाखूचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. बहुतांश सुगंधीत तंबाखू छत्तीसगड राज्यातून आणला जातो. मात्र धानोरा तालुक्यातील जांभळीझोरा गावात चक्क बोगस सुगंधीत तंबाखूची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गट्टा (फु.) येथील पोलीस मदत केंद्राच्या पथकाने केलेल्या कारवाईत 15 लाख रुपयांचा सुगंधीत तंबाखू आणि पॅकेजिंगच्या मशिनसह वाहन असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली, तर एक जण फरार आहे.

राज्य शासनाने सुगंधीत तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध केला आहे. मात्र जिल्ह्यात खुलेआमपणे सुगंधीत तंबाखूचा वापर करून बनविल्या जाणाऱ्या खर्रा शौकिनांचे प्रमाण पाहता मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखू आयात केला जातो. दरम्यान पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.)च्या पथकाला गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीनुसार, जांभळीझोरा गावातील अजीत कुजुर याच्या राहत्या घरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू बेकायदेशिरपणे तयार करून विक्री केल्या जात असल्याचे समजले. त्यानुसार कुजूर याच्या घरी पोहचून घराची व आजुबाजूच्या परिसराची पंचासमक्ष पाहणी घेतली असता, घरामध्ये एका चुंगळीमध्ये प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुचा साठा आढळून आला. तसेच पॅकिंगकरीता लागणारे इतर साहित्य सुद्धा मिळून आले. त्यानंतर पोलीस पथकाने आजुबाजूच्या परिसराची पाहणी केली असता, घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाच्या मागच्या सिटच्या खाली दोन पिवळ्या व दोन पांढ­ऱ्या रंगाच्या चुंगळीमध्ये सुगंधित तंबाखू मिळून आला.

सदर घरातून व वाहनातून सुगंधीत तंबाखु असलेल्या एकूण 103 पांढ­ऱ्या रंगाच्या चुंगळ्या (किंमत 12,05,380 रुपये), तसेच 2 पांढ­या व 2 पिवळ्या रंगाच्या चुंगळीत असलेला सुगंधीत तंबाखू (किंमत 3,05,100 रुपये), एका पिवळ्या रंगाच्या चुंगळीमध्ये मजा 108 हुक्का शिसा तंबाखू असे लिहीलेले 10 पॉलीथीनचे पॅकेट (एकूण किंमत अंदाजे 13,250 रुपये), पॅकींगकरीता लागणारे साहित्य ज्यामध्ये केकेपी लिहिलेले बॅक क्लोजर मशीन, ऑटोमॅटीक फिल्म सिलींग मशिन, पोर्टेबल बॅग शिलाई मशिन, स्टरेटनर मशिन, एक पांढऱ्या रंगाचे महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन (एम एच 33 ए.सी.5170) असा एकूण 22 लाख 50 हजार 230 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आरोपी अजीत जोहन कुजूर याचेकडे सदर मुद्देमालाबाबत सखोल चौकशी केली असता त्याने घटनास्थळावरून फरार आरोपीचे नाव प्रशांत याडवार, रा.गडचिरोली असे सांगितले. सर्व मुद्देमाल त्याचा असल्याचेही सांगितले. पोलिसांनी घरमालक अजीत जोहन कुजूर, साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके, दोघेही रा.ढोरप, ता.पवनी, जि.भंडारा तसेच अभिजित यादव नान्हे रा.उमरेड जि.नागपूर या सहकाऱ्यांना अटक केली. फरार आरोपी प्रशांत याडवार याचा शोध सुरु आहे. अधिक तपास पोउपनि. दयानंद भोंबे, पोमकें गट्टा (फु.) हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये सहा.पोलीस अधीक्षक (धानोरा) सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.)चे पोउपनि.दयानंद भोंबे व पोलीस अंमलदारांनी पार पाडली.