गडचिरोली : प्लॅटिनम ज्युबिली स्कूल व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी अमेय जोशी याने सीबीएसई इयत्ता बारावी परीक्षेत 94.8 टक्के गुण मिळवत गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल त्याचा प्लॅटिनम ज्युबिली स्कूलतर्फे सत्कार करण्यात आला.
अमेय हा अत्यंत बुद्धिमान, मेहनती आणि अभ्यासू विद्यार्थी असून यापूर्वीही त्याने दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. नुकत्याच झालेल्या जेईई मेन्स परीक्षेतही त्याने 99 पर्सेंटाइल गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि यशामुळे शाळेला मोठा गौरव प्राप्त झाला आहे.
अमेयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे सचिव अझिज नाथानी, प्राचार्य रहीम अमलानी, उपप्राचार्य पारस गुंडावार तसेच हेड ऑफ अकॅडेमिक्स अमीन नुरानी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेचे सचिव अझिज नाथानी यांनी सांगितले की, “अमेयचे यश हे त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे. त्याने केवळ शाळेचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. भविष्यातही तो मोठे यश संपादन करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राचार्य अमलानी म्हणाले, “अमेयसारखे विद्यार्थी ही शाळेची खरी ताकद आहे. त्याची जिद्द, शिस्त आणि अभ्यासातील सातत्य इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो.”
अमेयच्या या शानदार यशामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.






























