गडचिरोली : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उद्योगक्रांती घडताना दिसत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून धान, मका व कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारले जात असून शेतकरी आता केवळ उत्पादक न राहता कृषी उद्योजक बनत आहेत. शेतमालावर प्रक्रिया, प्रतवारी, पॅकेजिंग आणि विक्री व्यवस्थापनाद्वारे उत्पादनाला मूल्यवर्धन मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना मिळत आहे.
प्रक्रिया उद्योगांना गती
स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात राईस मिल, डाळ मिल, गोदाम, प्रक्रिया केंद्र, कलर सॉर्टेक्स, सौरऊर्जा संच यांसारख्या आधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण होत असून शेतकरी उत्पादक कंपन्यांमधून व्यवस्थापन, बाजारपेठ आणि उद्योग कौशल्य विकसित होत आहे. “उत्पादक ते उद्योजक” हा प्रवास स्मार्ट प्रकल्पामुळे प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
आरमोरी तालुक्यातील शिवणी (बु.) येथील ग्रीन गोंडवाना शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत धान स्वच्छता, प्रतवारी व डाळ प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आह. या प्रकल्पाची एकूण किंमत 77.66 लाख रुपये आहे. तर सिरोंचा येथील प्राणहिता शेतकरी उत्पादक कंपनीकडून 248.98 लाख रुपयांचा धान प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये आधुनिक राईस मिल, गोदाम तसेच सौरऊर्जा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
सीमाभागातही आधुनिक सुविधा
देसाईगंज-वडसा येथील शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत भात प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला आह. कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनीकडून आधुनिक धान प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे. तसेच मूलचेरा येथील शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत मका व कडधान्य स्वच्छता, प्रतवारी व प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे दुर्गम व सीमाभागातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रक्रिया आणि साठवणूक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गडचिरोली येथील झाडीपट्टी शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतही धान प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आह. आधुनिक राईस मिल, कलर सॉर्टेक्स, वे-ब्रिज आणि गोदाम सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतमालाला अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सौरऊर्जेमुळे प्रक्रिया उद्योगांना स्वावलंबन
स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी सौरऊर्जा संच उभारण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रक्रिया उद्योगांना वीजपुरवठ्याचे स्थिर साधन उपलब्ध होऊन उद्योग अधिक स्वावलंबी बनण्यास मदत होत आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
युवक व महिलांना रोजगार संधी
या प्रकल्पांमुळे ग्रामीण युवक आणि महिला बचत गटांसाठी स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, साठवणूक आणि विक्री व्यवस्थापन यामध्ये स्थानिक मनुष्यबळाला काम उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होत आहे.
स्मार्ट प्रकल्पातून ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभारून शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. गडचिरोलीतील सेंद्रिय तांदूळ, मका, डाळ तसेच आंबा, चिकू व फळपिकांवर आधारित उद्योग उभारण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.






























