गडचिरोली पोलिसांनी जप्त केला चारचाकी वाहनासह सुगंधी तंबाखू

गोंदियातील व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा

गडचिरोली : प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करत 5 लाख 44 हजार रुपयांचा तंबाखू आणि इनोव्हा वाहन जप्त केले. गोंदियाच्या एका व्यापाऱ्याकडून हा तंबाखू गडचिरोली जिल्ह्यात पाठवला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची वाहतूक करणा­ऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवली आहे.

दिनांक 22 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव (जि.गोंदिया)कडून देसाईगंज मार्गे चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू देसाईगंज हद्दीतील चिल्लर तंबाखू विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणार होता. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा अर्जुनी ते देसाईगंजकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला असता, संशयित सिल्व्हर रंगाचे टोयोटा कंपनीचे ईनोव्हा चारचाकी वाहन येताना दिसून आल्याने त्या वाहनाला तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहन थांबविण्यात आले.

पोलिसांनी वाहन चालक व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता आत 5,44,304 रुपये किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू मिळून आला. तो तंबाखू गोंदिया येथील रवी मोहनलाल खटवानी याने पाठवल्याचे चालकाने सांगितले. तंबाखूसह वाहतुकीसाठी वापरात आणलेली 3,80,000 रुपये किमतीची इनोव्हा कार (एम.एच.-15- बी.एन.-5689) असा एकूण 9,24,304 रुपये किमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलिसांनी जप्त केला.

अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे वाहनचालक आरोपी अश्पाक मुन्ना शेख, रा.संजयनगर पिंडकेपार, जि.गोंदिया आणि रवी मोहनलाल खटवानी, रा.गोंदिया यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि संदीप आगरकर करीत आहेत.

ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोउपनि. सरीता मरकाम, हवालदार दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, अंमलदार सचिन घुबडे, निशीकांत अलोणे, निकेश कोडापे यांनी पार पाडली.