Home क्राईम हेलिकॅाप्टरने नागपूरला नेऊनही लिपिकाचा जीव वाचवण्यात अपयश

हेलिकॅाप्टरने नागपूरला नेऊनही लिपिकाचा जीव वाचवण्यात अपयश

हायवा ट्रकखाली सापडली दुचाकी

गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालयातील ड्युटीवर सकाळी वेळेत पोहोचण्यासाठी निघालेल्या वरिष्ठ लिपिकावर काळ बनून आलेल्या ट्रकने झडप घातली. यात ट्रकच्या समोरच्या चाकात सापडेल्या त्या लिपिकाच्या डाव्या पायाचा चुराडा झाला. पण त्या स्थितीतही त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तातडीने पुढील उपचारासाठी पोलिसांच्या हेलिकॅाप्टरने नागपूरला हलविण्यात आले. मात्र नियतीला हे मान्य नसावे. नागपूरला पोहोचल्यानंतर उपचार मिळण्याआधीच त्यांनी प्राण सोडले. या दुर्दैवी घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विलास शंकर वासनिक (57 वर्ष) रा.मुरखळा असे त्या मृत वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. या घटनेची हकिकत अशी की, वासनिक हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या दुचाकीने मुरखळा भागातून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निघाले होते. मुख्य मार्गावरून जिल्हा न्यायालयाच्या मार्गाने वळण घेत असताना अंदाज चुकला आणि त्यांची दुचाकी एका हायवा ट्रकच्या चाकाखाली सापडली. यात दुचाकीसह त्यांचा डावा पायही सापडला. जड ट्रक पायावरून गेल्याने पायाचा चेंदामेंदा झालाच, पण त्या वेदना आणि मोठा रक्तप्रवाहाने वासनिक बेशुद्ध पडले.

वासनिक यांना प्रथम जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर डॅाक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे प्र.पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी तातडीने पोलीस दलाच्या दिमतीला असलेले हेलिकॅाप्टर उपलब्ध करून दिले. मात्र वासनिक यांचा वाचविण्यात यश आले नाही. वासनिक यांचा मुलगा बाबा वासनिक भामरागड तालुक्यातील कोठी मदत केंद्रात कार्यरत आहे.

गडचिरोली पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.