वडसा, आमगांव आणि चांदाफोर्टचा ‘अमृत भारत’ रेल्वे स्टेशनमध्ये समावेश

पंतप्रधान मोदी करणार आभासी भूमिपूजन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा (देसाईगंज) सोबत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चंद्रपूर येथील चांदाफोर्ट अशा तीन रेल्वे स्थानकांचा ‘अमृत भारत’ स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर अनेक सोयीसुविधा निर्माण करून स्थानकांना विकसित केले जाणार आहे. खासदार अशोक नेते यांच्या पाठपुराव्याचे हे यश मानल्या जात आहे. दरम्यान अमृत भारत योजनेनुसार रेल्वे स्थानकांमध्ये केल्या जाणाऱ्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ६ ऑगस्टला आभासी पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती खा.नेते यांच्या कार्यालयाने दिली.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील वडसा आणि आमगाव या स्टेशनवरून नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे या स्टेशनवर नागरिकांनी विविध सुविधा देण्यासाठी खा.नेते यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे नव्या बजेटनुसार आलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेत वडसा, आमगांव सोबत चांदाफोर्ट या महत्वाच्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून या स्थानकांवर नागरिकांसाठी आधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमृत भारत योजनेत भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासोबत मास्टर प्लॅन तयार करून त्यानुसार स्टेशनचे रूप बदलविले जाते. आयाताकृती क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छ टॉयलेट, लिफ्ट/एस्कलेटर, मोफत वाय-फाय अशा विविध बाबींचा त्यात समावेश होतो. स्थानकावर ‘एक स्टेशन एक उत्पादन’, उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, कार्यकारी समुपदेशक, व्यावसायिक बैठकीसाठी नियुक्त ठिकाणे, लँडस्केपिंग आदींवर भर दिला जाणार आहे.

वडसा स्थानकाच्या पुनर्विकासासाठी १८.४ कोटी
येत्या ६ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ५०६ रेल्वे स्थानकांसाठी ‘अमृत भारत’ योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ आभासी पद्धतीने (आॅनलाईन) करणार आहेत. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेसुद्धा आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोक ‌नेते यांनी केले आहे.