मुलचेरात रंगलेल्या महानाम संकीर्तन व भागवत सप्ताह सोहळ्याची सांगता

भाग्यश्री आत्राम यांनी घेतला सहभाग

मुलचेरा : तालुक्यातील देशबंधुग्राम व भगतनगर येथील मंदिर परिसरात आयोजित महानाम संकीर्तन व भागवत सप्ताह कार्यक्रमाला माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून पूजाअर्चा करत आशीर्वाद घेतले.

या तालुक्यात पुनर्वसित बंगाली बांधवांची संख्या मोठी आहे. येथील विविध गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. याही वर्षी देशबंधुग्राम आणि भगतनगर येथे महानाम संकीर्तन व भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. १४ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित या कार्यक्रमास १७ जानेवारी रोजी भाग्यश्री आत्राम यांनी भेट देऊन पूजाअर्चा करत आशीर्वाद घेतले. दोन्ही गावातील संकीर्तन कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून या कार्यक्रमासाठी देणगी दिली. एवढेच नव्हे तर उपस्थित भविकांसोबत महाप्रसादाचा आस्वादही घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास, राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, विवेकानंदपूरच्या सरपंच भावना मिस्त्री, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, दोन्ही गावातील ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील, कमिटीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.