
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंची (गोलंदाज) निवड करून त्यांना योग्य संधी देण्यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून उद्या (दि.9 मे) गडचिरोलीत चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतन शर्मा आणि प्रशांत वैद्य हे गडचिरोलीत येणार आहेत. जिल्हा प्रेक्षागार मैदानावर (जिल्हा स्टेडिअम) ही निवड चाचणी होणार आहे.
या निवड चाचणीच्या निमित्ताने जिल्ह्यातील वेगवान गोलंदाजांची क्षमता, फिरकी गोलंदाजीचे कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. ही निवड प्रक्रिया विदर्भ प्रिमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी राबविली जात आहे. यावेळी निवड समितीचे सदस्य विकास गवते, विवेक नायडू, सुधीर वानखेडे हेसुद्धा राहणार आहेत.
क्रिकेटपटू चेतन शर्मा आणि प्रशांत वैद्य हे गडचिरोली जिल्ह्यातील पुरूष आणि महिला गोलंदाजांचे मूल्यांकन करणार आहेत. निवड झालेल्या गोलंदाजांना नागपूर येथील प्रगत शिबिरासाठी आमंत्रित केले जाईल.
या चाचणीसाठी 16 ते 25 वयोगटातील पुरूष, तसेच 15 ते 23 वयोगटातील महिला खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक मंगेश देशमुख यांनी केले आहे.






























