गडचिरोली : गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार, दि.22 सप्टेंबर रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्कृतीचे जतन आणि स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश नृत्य, समूह नृत्य, भक्तीगीत आदी विविध कलाप्रकार सादर करण्यात येणार आहेत. कला, संस्कृती, श्रद्धा आणि एकात्मतेचा संगम असलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
रक्तदानात सहभागी व्हा – जिल्हाधिकारी
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांसह विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
गरजू रुग्णांना आवश्यकता असताना रक्त उपलब्ध व्हावे, तसेच स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती वाढावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच प्रसुतीच्या वेळी महिलांना अनेकदा तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळी रक्तदात्यांनी केलेले रक्तदान गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरते.
रक्तदान ही सामाजिक बांधिलकी जपणारी मानवतावादी कृती असून ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून सेवाभाव आणि लोकसहभागाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रक्तदानासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
































