गडचिरोली : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. यात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना यु.डी.आय.डी. कार्ड, रेल्वे प्रवास सवलत प्रमाणपत्र, विविध साहित्य व उपकरणे, तसेच 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत सामूहिक तथा वैयक्तिक विविध कल्याणकरी योजनांचे लाभ देण्यात आले.
‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ या वार्षिक संकल्पनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग व्यक्ति आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकरिता विविध प्रकारचे पुनर्वसनात्मक शिक्षण व प्रशिक्षणात्मक कार्यक्रम जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषदेद्वारा वर्षभर आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘जागतिक दिव्यांग दिनाचे’ आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंकी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजीत राऊत उपस्थित होते.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राद्वारा दिव्यांग युवकांकरीता निःशुल्क आयोजित करण्यात येत असलेल्या ‘कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमा’चे उद्घाटन रामदास मसराम व आर.आर.पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रशिक्षण निवड प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. यावेळी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.