Home दैनंदिन बातम्या घोट परिसरातील 14 गावांमधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

घोट परिसरातील 14 गावांमधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार

मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींचा थेट संवाद

चामोर्शी : रेगडी-हळदवाही क्षेत्रातील 1958 पासून शेतीच्या पट्ट्यापासून वंचित शेतकऱ्यांना पट्टे मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) अनिरूद्ध पालकर यांनी या परिसरातील सात गावातून आलेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या क्षेत्राचे आमदार डॅा.मिलिंद नरोटे आणि माजी खासदार डॅा.अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांच्या पुढाकाराने मंजेगाव येथे या भेट व संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी पालकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. प्रामुख्याने या भागातील 14 गावांच्या सिंचन प्रश्नांबाबत महत्वाची चर्चा झाली. या विषयासाठी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी रोशन मेश्राम व अभियंता विकास दूधबावरे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, डॉ.भारत खटी उपस्थित होते.

यावेळी घोट क्षेत्रातील मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, जवाहर नगर, सिमुलतला, किसाननगर, हळदवाही, हळदवाहीटोला, पेटतळा, भाडभिडी आदी भागातील शेतकरी व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांना माजी खासदार अशोक नेते यांनी भ्रमणध्वनीवर लाईव्ह मार्गदर्शन केले. याशिवाय अनिरुद्ध पालकर, डॉ.प्रणय खुणे, डॉ.भारत खटी यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी अनिरुद्ध पालकर म्हणाले, जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात रोजगार-स्वयंरोजगाराची दालने उघडली जात आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले जाणार आहे. त्यात घोट भागातील 14 गावातील नागरिकांनाही न्याय मिळवून देणार, असे ते म्हणाले.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, दिनेश मुजुमदार, विनोद किरमे, पलास घरामी, सुमेन विस्वास, राजू सातपुते, संदीप भोवरे, जितेन शहा, अंकुश तरफदार, आयोजक माजी सरपंच रमेश लेकलवार, बाबुराव बर्लावार, विठ्ठल बोंमकंटीवार, वर्षा गर्तुलवार, गंगाधर रामटेके, विनायक डुबूलवार, वसंत तुंकलवार व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक संजय गोरडवार यांनी केले तर आभार रवींद्र गर्तुलवार यांनी मानले. या संवाद कार्यक्रमासाठी मंजेगाव येथील शेतकरी, युवक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.