गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा पार पडल्यानंतर आता २ ते ४ डिसेंबर या कालावधीत क्रीडा संकुल देवरी येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी शुक्रवारी गडचिरोली प्रकल्पाचे खेळाडू रवाना झाले. विभागीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी प्रकल्पातील सुमारे ३३० खेळाडूंनी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर कसून सराव केला. यासाठी २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसीय सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
देवरी येथे आदिवासी विकास विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, नागपूर, वर्धा, भंडारा व देवरी अशा ९ प्रकल्पातील खेळाडूंचा समावेश आहे.
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ.प्रभु सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर यांनी सराव शिबिराचे नियोजन केले होते. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची तयारी करून घेण्यात आली.
या शिबिरात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटमधील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळांमधील सुमारे ३३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक तर लांबउडी , उंचउडी , गोळाफेक , थाळीफेक , भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळांचा सराव करण्यात आला.
सराव शिबिरादरम्यान विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या कर्मचारी व खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत अधीक्षक देवीदास चोपडे व अधीक्षिका निमा राठोड यांच्या व्यवस्थापनात करण्यात आली होती.