Home क्राईम घरफोडीतील आरोपी 24 तासात कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात

घरफोडीतील आरोपी 24 तासात कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात

चोरीतील सोने व रक्कमही मिळाली

कुरखेडा : कुरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आंधळी येथे 15 जून रोजी घडफोडी करून सोने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना कुरखेडा पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली. त्याच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, आंधळी येथील रहिवासी अशोककुमार वाघमारे हे घराला कुलूप लावून आपल्या सहकुटुंब बाहेरगावी गेले असताना आरोपींनी घराचे कुलूप तोडून कपाटामध्ये असलेले रोख 3 हजार रुपये, मातीच्या गुल्लकमध्ये असलेले अंदाजे 7,000 रुपये, तसेच लाकडी कपाटात ठेवलेला 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप (आताची किंमत 1.50 लाख रुपये) असा मुद्देमाल चोरू नेला होता.

आरोपींनी घटनास्थळावर कोणतेही पुरावे न सोडल्याने आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र कुरखेडा येथील पोलीस पथकाने तांत्रिक पुरावे व गोपनिय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा शिताफीने शोध घेऊन आरोपी वैभव समीर जांभूळकर (29 वर्षे) व गणेश देविदास भैसारे (33 वर्षे) दोघेही रा.आंधळी ता.कुरखेडा यांना दि.16 जून रोजी अटक केली.

सदर आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यात आरोपींच्या चौकशी दरम्यान गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्यासह कुरखेडाचे एसडीपीओ रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोनि.महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात कुरखेडा ठाण्याच्या पथकाने केली.