Home दैनंदिन बातम्या पटोलेंच्या बनावट पत्रानंतर पुन्हा राईस मिलच्या चौकशीला वेग

पटोलेंच्या बनावट पत्रानंतर पुन्हा राईस मिलच्या चौकशीला वेग

मुख्यमंत्र्यांशी बोलणार- बावनकुळे

गडचिरोली : जिल्ह्यातील कथिक धान घोटाळ्यातील संशयित राईस मिलर्सना वाचवण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या लेटरहेडचा आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बनावट पत्र देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा त्या राईस मिलच्या चौकशीला वेग आला आहे. पटोले यांनी ते पत्र आपल्या कार्यालयाने दिले नसल्याचे स्पष्ट करत चौकशी करण्याची मागणी केली. दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विषय मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकून जय अंबे राईस मिलची चौकशी केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे हा धान घोटाळा कधी उघडकीस येणार याची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.

देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील जय अंबे राईस मिल विरूद्ध कोट्यवधी रुपयांच्या धान घोटाळ्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र पटोले यांच्या नावे 1 जून 2026 ला दिलेल्या पत्रात ‘मला आता सत्यस्थिती माहित झाली असून मी केलेली तक्रार मागे घेत आहे’, असा मजकूर नमूद होता. हे पत्र मंत्री भुजबळ यांच्या कार्यालयास देण्यात आले होते. मात्र ते पत्र सोशल मीडियावर फिरू लागताच पटोले यांनी ते पत्र माझे नाहीच, असे स्पष्ट करत धान घोटाळ्याची चौकशी करण्यासंबंधी दुसरे पत्र अन्न व नागरी पुरवठा मंत्र्‍यांना दिले.

ते बनावट पत्र कोणी दिले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या ज्येष्ठ नेत्याच्या नावाने शासनाकडे खोटे पत्र तयार करणे ही गंभीर बाब आहे. आपल्या बनावट स्वाक्षरीचा गैरवापर करणाऱ्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पटोले यांनी दिला. त्यामुळे खरंच त्याबाबत सखोल चौकशी केली जाणार का, आणि बनावट पत्र तयार करणाऱ्याला उघड पाडले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या पद्धतीने पटोले यांच्या बनावट पत्राचा वापर यापूर्वीही तर झाला नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.