Home दैनंदिन बातम्या शेतकऱ्यांनो, यादीत नाव पहा आणि प्रक्रिया वेळेत करून कर्जमुक्त व्हा

शेतकऱ्यांनो, यादीत नाव पहा आणि प्रक्रिया वेळेत करून कर्जमुक्त व्हा

आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

अहेरी : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 2,539 शेतकरी पात्र ठरले असून, त्यांचे एकूण ₹ 11.74 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी अनेक शेतकऱ्यांचे नाव यादीत येईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आपले नाव तपासण्याचे आवाहन आमदार आत्राम यांनी अहेरी मतदारसंघातील शेतकऱ्यांना केले. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी बायोमेट्रिक / आधार प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन तात्काळ प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम मंजूर होणार आहे.

“कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये, हीच आमची अपेक्षा आहे. शेतकरी बांधवांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा,” असे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.