‘दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा’

युवा कार्य प्रशिक्षण योजनेची कार्यशाळा

गडचिरोली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्यातील प्रथम लाभार्थ्याची गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्याचा जिल्ह्यावासियांना अभिमान आहे. या योजनेसह राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कार्यशाळेचे उद्घाटन ना.आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वांना समान न्याय व समान मदत देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात महिला आत्मनिर्भर व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. यासोबतच बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज, अन्नपूर्णा योजनेतून गॅस सिलेंडर, महिलांना मोफत उच्च शिक्षण, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आणि तिर्थदर्शन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजना सर्वापर्यंत पोहोचवून त्याचा लाभ द्या, असे मंत्री आत्राम यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रशिक्षणार्थींनी काटेकोरपणे प्रशिक्षण पूर्ण करून भावी आयुष्यात या अनुभवाचा आणि संधीचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले.

51 प्रशिक्षणार्थींचा सत्कार

जिल्ह्यात विविध आस्थापनेवर निवड झालेल्या 51 प्रशिक्षणार्थींचा धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयं पोर्टलवर पदे अधिसूचित करणे व उमेदवार नोंदणीच्या प्रक्रियेबाबत तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध शासकीय कार्यालय, महामंडळ, सहकारी बँका व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते.